ठाण्यात व्यावसायिकाकडून खंडणी मागणारे दोघे रंगेहाथ अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : शहरातील एका व्यावसायिकाकडून लाखोंची खंडणी मागणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. तडजोडीअंती दोन लाख रुपये घेत असतानाच ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखा घटक ५ (वागळे इस्टेट) यांना गौरव स्वीट्सचे मालक विरल भानजी पटेल यांनी तक्रार अर्ज दिला होता. दोन व्यक्तींकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली जात असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले होते. याबाबत चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्ती खंडणी मागत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सापळा रचला.
वसंत विहार शाळेसमोरील चौकात व्यावसायिक विरल पटेल यांच्याकडून तडजोडीनंतर दोन लाख रुपये घेत असताना पोलिसांनी सुशांत संजय सुर्वे (३०, रा. मानपाडा, ठाणे) आणि अक्षय जयंत करंजवकर (३५, रा. कोलबाड रोड, ठाणे) या दोघांना १३ मार्च रोजी रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त पराग मणेरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या पथकाने केली.