पुण्यातील कासारवाडी भागात पुरवठा विभागाची गोडाऊनवर धाड; दोन टेम्पोमधून ५७ भरलेले आणि २०७ रिकामे सिलेंडर जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस सिलेंडरवर निर्बंध लादले आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. अन्न व धान्य पुरवठा विभागाने कासारवाडी येथील एका अवैध गोडाऊनवर धाड टाकून गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोषींवर मेस्मा (MESMA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडी परिसरात एका गोडाऊनमध्ये अवैध साठवणूक आणि रिफिलिंग सुरू असल्याची खबर प्रशासनाला लागली होती.
दोन टेम्पोमधून भारत गॅसच्या ५७ भरलेल्या आणि २०७ रिकाम्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. टेम्पोच्या बाजूला गॅसचे अनेक सील सापडले आहेत.घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये अनधिकृतपणे गॅस भरला जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.कमर्शियल गॅसच्या तुटवड्याचा फायदा घेऊन काळाबाजार करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
अन्न व धान्य पुरवठा विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून संबंधितांवर अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा म्हणजेच ‘मेस्मा’अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या कायद्यांतर्गत होणारी ही शहरातील पहिलीच मोठी कारवाई ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान अवैध साठवणूक आणि रिफिलिंगमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो.या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून दोषींना सोडले जाणार नाही, असे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.