नालासोपाऱ्यात गुंडाराज! सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Spread the love

नालासोपाऱ्यात गुंडाराज! सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

योगेश पांडे / वार्ताहर

नालासोपारा – नालासोपाऱ्यातील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नसून आता गुंडांनी चक्क गॅस पंपांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. नालासोपारा पूर्व येथील धानीव बाग परिसरातील ‘गुजरात गॅस’ सीएनजी पंपावर मध्यरात्री काही स्थानिक गुंडांनी अक्षरशः धुडगूस घालत कर्मचारी आणि ग्राहकांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे याच पंपावर गुंडगिरी होण्याची ही तिसरी वेळ असून, वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ११ मार्च रोजी पहाटे १ च्या सुमारास पंपावर नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. यावेळी आशुतोष दुबे, राज झा आणि शुभम यादव हे आपल्या दोन ते तीन साथीदारांसह पंपावर आले. कोणत्याही कारणाशिवाय या टोळीने तिथे उपस्थित असलेले ग्राहक आणि कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले आणि या गुंडांनी सर्वांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, पुन्हा दिसलात तर जीवे मारू, अशी धमकी देऊन या गुंडांनी तिथे दहशत निर्माण केली.

पंपावर गोंधळाची परिस्थिती पाहत कर्मचाऱ्यांनी तात्काळ ११२ हेल्पलाईनवर संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल शिंगाणे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून पीडितांना एफआयआर दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ही घटना घडून वेळ उलटूनही मुख्य आरोपी अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

आमच्या पंपावर अशा घटना वारंवार घडत आहेत, ही तिसरी वेळ आहे. कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,” अशी कैफियत पंप व्यवस्थापक सुरेश मिश्रा यांनी मांडली आहे. रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नालासोपारा पोलिसांनी या गुंडांच्या मुसक्या आवळून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon