आकर्षक व्याजदराचे आमिष; मानखुर्दमध्ये १३३ गुंतवणूकदारांची ५.१३ कोटींची फसवणूक

Spread the love

आकर्षक व्याजदराचे आमिष; मानखुर्दमध्ये १३३ गुंतवणूकदारांची ५.१३ कोटींची फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून १३३ गुंतवणूकदारांची सुमारे ५ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मानखुर्द परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी ड्रीम सनशाईन डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक व भागीदारांविरुद्ध मानखुर्द पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमानत अली अन्सारी, रहिम अब्दुल अन्सारी, नवाजीस अली अन्सारी, नईम सरवर आणि योगिनी शिर्के या पाच जणांविरुद्ध फसवणूक व अपहारासह महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण कंपनीला टाळे लावून फरार झाल्याचे समोर आले आहे.

मानखुर्द येथील मोहिते पाटीलनगर परिसरात या कंपनीचे कार्यालय होते. रिअल ऑस्सी वॉटर, साखर, खजूर आणि बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करून मोठा नफा मिळत असल्याचे सांगत गुंतवणूकदारांना दरमहा पाच टक्के परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. या आमिषाला भुलून १३३ हून अधिक गुंतवणूकदारांनी विविध योजनांत एकूण ५ कोटी १३ लाख ८५ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती.

दरम्यान, फेब्रुवारी २०२६ पासून गुंतवणूकदारांना व्याज देणे बंद झाल्यानंतर त्यांनी कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर कंपनीचे मालक आणि भागीदार फरार झाल्याचे उघड झाले.

या प्रकरणात एका आयटी अभियंत्यासह त्यांच्या आठ परिचितांनी सुमारे २३ लाख ७० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातीला त्यांना नियमित व्याज मिळत होते. मात्र नंतर व्याज बंद झाल्यानंतर अधिक चौकशीत फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथकाद्वारे शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, आणखी गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon