सागर मोहळकरवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई; मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – जामखेड शहरातील तपनेश्वर रोड ते खाडेनगर मार्गावरील नुराणी कॉलनी परिसरात पैलवान सागर किसन मोहळकर याच्यावर झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपीकडून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, विनानंबर दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्चला सायंकाळी साडेसातच्या सुमारास
मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी सागर मोहळकर यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी किसन चांगदेव मोहळकर यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109(1) तसेच आर्म अॅक्ट 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता गृहित धरून आरोपींचा शोध घेण्यासाठी एलसीबीची दोन पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी जिक्री येथील शिवारात सापळा रचून अभिमन्यु महादेव पोते (२४) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह हा कट रचल्याची कबुली दिली.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे आणि चिन्या हे तिघे आरोपी सध्या फरार आहेत. ते कोथरुड, पुणे परिसरातील असल्याचे समोर आले आहे. या आरोपींनीच सागर मोहळकर यांच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ३५ हजार रुपयांचा गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, ४० हजार रुपयांची विनानंबर ज्युपिटर दुचाकी आणि १५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि त्यांच्या पथकाने केली.