जमीन व्यवहारात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची १.३३ कोटींची फसवणूक; बंदुकीच्या धाकावर धमकी, सहा जणांवर गुन्हा

Spread the love

जमीन व्यवहारात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची १.३३ कोटींची फसवणूक; बंदुकीच्या धाकावर धमकी, सहा जणांवर गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : जमिनीच्या व्यवहारातून निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या मित्राची तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणातील फिर्यादी गोरख चव्हाण हे शहर पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले असून ते जटवाडा रोडवरील एकतानगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे मित्र यासीन खान महेमूद खान हे जुन्या दुचाकी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. यासीन खान यांच्या माध्यमातून चव्हाण यांची ओळख मुख्य आरोपी शेख इरफान शेख शफीक याच्याशी झाली. त्यानंतर १८.७ गुंठे जमिनीचा व्यवहार दोन कोटी रुपयांना निश्चित करण्यात आला.

या व्यवहारासाठी फिर्यादींकडून फेब्रुवारी २०२४ मध्ये एकूण १ कोटी ३३ लाख रुपये देण्यात आले. त्यामध्ये चव्हाण यांचे सुमारे २० लाख रुपये तर उर्वरित रक्कम यासीन खान यांची असल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र एवढी मोठी रक्कम स्वीकारूनही आरोपींनी जमिनीचे खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली.

यानंतर संशय आल्याने २३ जुलै २०२४ रोजी फिर्यादींनी १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर रजिस्टर नोटरी करून सर्व आर्थिक व्यवहाराची नोंद केली. त्यानंतर आरोपी इरफानने वेगवेगळ्या तारखांचे आणि रकमेचे धनादेश दिले. मात्र हे धनादेश बँकेत सादर केल्यानंतर वटले नाहीत. काही धनादेश बंद असलेल्या खात्यांमधून दिल्याचेही तपासात उघड झाले.

दरम्यान, आरोपींनी नुकसानभरपाई म्हणून सलमान हॉल, बिल्डिंग क्रमांक २ मधील दुकान क्रमांक ३ आणि ४ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यासीन खान दुकानाचा ताबा घेण्यासाठी गेले असता आरोपी इरफानचे वडील शेख शफीक यांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात मुख्य आरोपी शेख इरफान शेख शफीक, त्याचा भाऊ शेख सलमान शेख शफीक, आई गौसिया बेगम शेख शफीक, वडील शेख शफीक उर्फ शेख साहब (रा. सलमान हॉल, दिल्ली गेट परिसर), नोकर शेख जमील शेख गुलाम रसूल (रा. रोजेबाग ईदगाह झोपडपट्टी) आणि शेख इम्रान शेख गफ्फार (रा. कैसर कॉलनी) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon