विरारमध्ये वाहतूक पोलिसांसमोरच महिला रिक्षाचालकाला बेदम मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर
व्हायरल
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एका महिला रिक्षाचालकास बेदम मारहाण झाल्याची संतापजनक घटना सोमवारी रात्री घडली. विरार पूर्व रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा उभी करण्याच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला असून, यामध्ये महिला चालक गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे, ही घटना कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांसमोरच घडली, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
मिळालेली माहितीनुसार , सिद्धी सातारकर या विरारमध्ये रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्री स्थानक परिसरात रिक्षा लावण्याच्या कारणावरून त्यांचा काही स्थानिक व्यक्तींशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संबंधित व्यक्तींनी सिद्धी यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या समोरच जर अशी घटना घडत असेल, तर सामान्यांचे काय? असा सवाल नागरिक विचारत आहेत. विरार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.