कल्याणमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; गतिमंद भावाला मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हा

Spread the love

कल्याणमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; गतिमंद भावाला मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात बिर्याणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर आणि तिच्या गतिमंद भावावर पाच जणांनी हल्ला करून तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुणी आपल्या २९ वर्षीय गतिमंद भावासोबत स्कूटरवरून बिर्याणी घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका रिक्षामधील पाच जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. नेतिवली येथील पाण्याच्या टाकीजवळ रस्ता संपल्याने त्यांना थांबावे लागले. या संधीचा फायदा घेत आरोपींनी रिक्षामधून उतरून तरुणीच्या भावाला लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.

आपल्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणीला आरोपींनी केसाला धरून ओढत निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपींनी तरुणीचा मोबाईल हिसकावून तो ‘एअरप्लेन मोड’वर टाकला. “आम्ही पोलिसांचे मित्र आहोत, पोलीस आमच्या हातात आहेत,” अशी धमकी देत आरोपींनी तरुणीचे अश्लील व्हिडीओही तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार केल्यास ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली.

या दरम्यान मदतीसाठी आलेल्या एका दुचाकीस्वारालाही आरोपींनी मारहाण करत त्याची दुचाकी फोडल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणीने आपल्या आईला लोकेशन पाठवल्याचे समजताच आरोपींपैकी एकाने पोलिसांना फोन केल्याची माहितीही समोर आली आहे.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याऐवजी उलट पीडित भाऊ-बहिणीलाच रात्री बाहेर का फिरता, असा प्रश्न विचारत त्यांना तेथून पाठवून दिल्याचा आरोप पीडितांकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, पीडित तरुणीने घरी जाऊन संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून नितीन दिलीप बिरादार (३३) आणि अभिषेक राजकुमार सोनी (२४) या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर सोहेल तांबोळी, बाबू आणि एका रिक्षाचालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेमुळे परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon