कल्याण डोंबिवलीत ट्रेडिंगच्या आमिषाने विद्यार्थ्यांची फसवणूक; खात्यांमधून लाखोंची उलाढाल, ५०-६० विद्यार्थी बळी

Spread the love

कल्याण डोंबिवलीत ट्रेडिंगच्या आमिषाने विद्यार्थ्यांची फसवणूक; खात्यांमधून लाखोंची उलाढाल, ५०-६० विद्यार्थी बळी

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : ऑनलाईन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत विद्यार्थ्यांच्या नावावर बँक खाती उघडून त्यातून लाखो रुपयांची उलाढाल केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण डोंबिवली परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात १८ ते १९ वयोगटातील सुमारे ५० ते ६० विद्यार्थी फसवणुकीचे बळी ठरल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचित मित्रांमार्फत ऑनलाईन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. ट्रेडिंगसाठी बँक खाते आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नावावर खाती उघडून त्यातून लाखो रुपयांचे व्यवहार करण्यात आल्याचे समोर आले. सुमारे दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांच्या खात्यांमधील संशयास्पद व्यवहार त्यांच्या निदर्शनास आले.

प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना घेऊन परिमंडळ ३ चे उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या खात्यांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी उपायुक्त झेंडे यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यक्तीला आपली वैयक्तिक कागदपत्रे, बँक तपशील किंवा ओटीपी देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, परिसरात अशा प्रकारच्या आणखी घटना घडल्या आहेत का, याचा पोलिसांकडून तपास सुरू असून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून या घोटाळ्याचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon