रायगड जिल्ह्यात तरुण विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; पोलिसांनी संशयित आरोपी पतिला ठोकल्या बेड्या

रायगड जिल्ह्यात तरुण विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; पोलिसांनी संशयित आरोपी पतिला ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

रायगड – रायगड जिल्ह्यात एक मोठी घटना घडली असून तरुण विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. म्हसळा तालुक्यातील दगडघूम-पाभरे परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. चिरेखाणीवर मजुरी करणारी २० वर्षीय विवाहित महिलेचं पार्थिव आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दगडघूम-पाभरे येथील चव्हाण यांच्या चिरेखाणीवर सतीश सुभाष चव्हाण (२२) व त्याची पत्नी निकीता सतीश चव्हाण (२०) हे दोघे मजुरीचे काम करत होते. काही दिवसांपूर्वी निकीता बेपत्ता झाल्याची तक्रार पती सतीश याने म्हसळा पोलीस ठाणे येथे दाखल केली होती. मात्र, बुधवारी सकाळी दगडघूम कासेखोल भागात निकीताचं पार्थिव आढळून आल्याची माहिती समोर आली. तिच्या डोक्यावर गंभीर मारहाणीचे वळ असून कवटी फुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

पार्थिव निर्जन ठिकाणी टाकलेल्या अवस्थेत सापडल्याने ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, निकीताचे वडील महादेव रामू राठोड हे मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळताच गुलबर्गा (कर्नाटक राज्य) येथून तातडीने म्हसळ्यात दाखल झाले. मात्र, येथे आल्यानंतर त्यांना मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समजली. महादेव राठोड यांनी माध्यमांशी बोलताना जावई सतीश व त्याच्या काही साथीदारांनीच मुलीची हत्या केल्याचा आरोप केला असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.अवघ्या आठ महिन्यांपूर्वी निकीताचा विवाह झाला होता, अशीही माहिती त्यांनी दिली. या घटनेमुळे म्हसळा तालुक्यात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी निष्पक्ष व सखोल चौकशीची मागणी केली आहे. रायगड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, म्हसळा पोलिसांनी संशयित आरोपी सतीश चव्हाण याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवघ्या सहा महिन्यांत संसाराचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नेमकी ही हत्या आहे की घातपात आहे? या दृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon