महाराष्ट्र एटीएसची मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी भागात एकाच वेळी तीन ठिकाणी छापेमारी; महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – प्रतिबंधित दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (ISIS) वाढत्या ऑनलाईन कट्टरपंथी प्रचाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. सोमवारी रात्री मुंबईत एटीएसने मोठी धडक कारवाई केली. मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी या अत्यंत गजबजलेल्या परिसरातील एकूण तीन ठिकाणांवर एटीएसने एकाच वेळी छापे टाकले. या धाडसी कारवाईमुळे संपूर्ण शहरात तसेच उपनगरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी उशिरा एटीएसच्या विशेष पथकांनी कुर्ला आणि गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात शोधमोहीम सुरू केली. ही कारवाई मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून एटीएसला काही खात्रीशीर इनपुट्स मिळाले होते. काही तरुण डिजिटल प्लॅटफॉर्मचा, विशेषतः एनक्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सचा वापर करून आयसिसच्या ISIS कट्टरपंथी विचारसरणीचा प्रसार करत आहेत, असा संशय यंत्रणांना होता. या माहितीची शहानिशा केल्यानंतर एटीएसने या संशयास्पद ठिकाणांची नाकाबंदी करून छापेमारी केली.
या छापेमारीदरम्यान एटीएसने संशयितांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात तांत्रिक आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. यामध्ये अनेक हाय-एंड स्मार्टफोन्स, संशयास्पद सिम कार्ड्स, लॅपटॉप आणि हार्ड डिस्क यांसारख्या उपकरणांचा समावेश आहे. संशयित व्यक्ती कोणत्या टेलिग्राम चॅनेल्स, डार्क वेब लिंक्स किंवा सोशल मीडिया ग्रुप्सच्या माध्यमातून परदेशातील हँडलर्सच्या संपर्कात होत्या, याची माहिती आता फॉरेन्सिक तपासातून समोर येईल. जप्त केलेली सर्व उपकरणे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. त्यातील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे.
हे संशयित केवळ कट्टरपंथी सामग्री पाहत होते की नवीन तरुणांची भरती करण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत होते, याचा कसून तपास सुरू आहे. या प्रकरणाचे कनेक्शन थेट परदेशातील आयसिस हँडलर्सशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या छापेमारीत काही जणांची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. तर काहींना पुढील चौकशीसाठी एटीएस कार्यालयात नेण्यात आले आहे. एटीएसने अद्याप अधिकृत अटक जाहीर केली नसली तरी, तपासाची व्याप्ती वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी काळात मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही अशाच प्रकारची मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.