तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग; धुराच्या लोटांमुळे परिसरात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील डंपिंग ग्राउंडला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आगीचे स्वरूप इतके मोठे आहे की, डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याचे अजस्त्र ढिग जळून खाक झाले असून संपूर्ण परिसरात काळपट आणि दाट धुराचे लोट पसरले आहेत. या धुरामुळे लगतच्या वसाहतींमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
आग लागल्याची वर्दी मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेतली. आगीची तीव्रता पाहता वाशी, नेरुळ, कोपरखैराणे, ऐरोली, बेलापूर यासह एमआयडीसी विभागाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पथके घटनास्थळी दाखल झाली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आग धुमसत असल्याने ती विझवण्यासाठी जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
सुदैवाने या भीषण आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, डंपिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगींमुळे तुर्भे आणि वाशी परिसरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. “नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.