बदलापूर पुन्हा हादरलं; स्कूल बसमध्ये चालकाचं विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य

Spread the love

बदलापूर पुन्हा हादरलं; स्कूल बसमध्ये चालकाचं विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य

योगेश पांडे / वार्ताहर

बदलापूर – बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी एका स्कूल व्हॅनमध्ये चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर, आता पुन्हा एका शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी बसचालकाविरोधात पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत ही विद्यार्थिनी शिक्षण घेते. शाळेतून घरी सोडत असताना बसमध्ये इतर विद्यार्थी कमी असताना किंवा ही विद्यार्थिनी एकटी असताना चालकाने तिची छेड काढली आणि विनयभंग केला. शालेय परिवहन नियमांनुसार बसमध्ये महिला मदतनीस असणे अनिवार्य आहे, मात्र या बसमध्ये कोणतीही महिला कर्मचारी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पीडित विद्यार्थिनीने घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. संतापलेल्या पालकांनी तातडीने बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बसचालकावर पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

विशेष म्हणजे,गुरुवारीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बदलापूरचा दौरा करून शाळांच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. त्यांच्या दौऱ्यानंतर लगेचच हा प्रकार समोर आल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बदलापुरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon