नागपुरात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची मोठी कारवाई; तब्बल ५०५ किलो गांजा जप्त करत ट्रक चालकाला अटक

Spread the love

नागपुरात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची मोठी कारवाई; तब्बल ५०५ किलो गांजा जप्त करत ट्रक चालकाला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर : शहरात अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत नागपूर पोलीस अंतर्गत कार्यरत अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सने तब्बल ५०५ किलो गांजा जप्त केला आहे. मौदा तालुक्यातील माथनी टोल प्लाझाजवळ सापळा रचून एका ट्रकमधून ही मोठी खेप पकडण्यात आली. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून, ओडिशाहून नागपूरमध्ये चोरट्या मार्गाने गांजा आणला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सच्या विशेष पथकाने मौदा येथील माथनी टोल नाक्यावर कारवाईची तयारी केली. मोबाईल लोकेशन ट्रॅकिंगच्या सहाय्याने संशयित ट्रकची हालचाल लक्षात घेण्यात आली होती. संबंधित ट्रक ओडिशामधून नागपूरच्या दिशेने येत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी टोल प्लाझाजवळ सापळा रचला आणि ट्रक अडवला.

ट्रकची कसून झडती घेतली असता त्यामध्ये मालवाहतुकीच्या आड लपवून ठेवलेले सुमारे ५०५ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी त्वरित संपूर्ण माल जप्त करून ट्रक चालकाला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारातील किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्या अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाची कसून चौकशी सुरू असून, या आंतरराज्य गांजा तस्करी टोळीमध्ये आणखी कोणकोण सहभागी आहेत? याचा शोध घेतला जात आहे. ओडिशा आणि महाराष्ट्रातील संबंधित संपर्कांची माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. नागपूरमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon