पुण्यात काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला; ‘गुंडाला तात्काळ अटक करा’ — हर्षवर्धन सपकाळ

Spread the love

पुण्यात काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला; ‘गुंडाला तात्काळ अटक करा’ — हर्षवर्धन सपकाळ

पुणे : काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुण्यातील मित्र मंडळ चौकातील दैनिक पुढारी कार्यालयात बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला असून, संबंधित आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसचे म्हणणे आहे की, भाजपचा गुंड तुषार दामगुडे याने पवार यांना धमकावत मारहाण केली. “ही घटना म्हणजे राज्यात गुंड प्रवृत्तीला मिळणाऱ्या अभयाचे द्योतक आहे,” असा आरोप काँग्रेसने केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने अशा ‘मर्द मावळ्यांचे’ राज्य फोफावत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा निषेध करताना, “या गुंड प्रवृत्तीला तात्काळ पायबंद घालावा. संबंधित आरोपीला लगेच अटक करून तुरुंगात टाकण्यात यावे; त्याची खरी जागा तीच आहे,” अशी ठाम मागणी केली. “महाराष्ट्राला नासवणाऱ्या प्रवृत्तींना अभय देऊ नये. हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी पोलीस कारवाईबाबत पुढील तपशीलांची प्रतीक्षा असून, राजकीय वर्तुळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon