कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागल्याने मानसिक संतुलन बिघडलेल्या ३० वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – श्वान चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागल्याने भ्रमिष्ठ झालेल्या एका ३० वर्षीय तरूणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रेबीजसारख्या गंभीर आजाराबाबत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. आयश विश्वनाथ अमीन (३०) असे मृत तरूणाचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडे असलेल्या तिसगाव नाका परिसरात राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तिसगाव नाका परिसरात एका भटक्या श्वानाने आयशच्या पायाचा लचका तोडला होता. श्वान चावल्यानंतर त्याने तातडीने उपचार घेणे अपेक्षित होते. मात्र त्याने केवळ एकच इंजेक्शन घेतले आणि पुढील उपचार पूर्ण केले नाहीत. गेल्या दोन-चार दिवसांपासून आयशच्या वागण्यात विचित्र बदल जाणवू लागले होते.पाणी पाहून भीती वाटण्यासह त्याच्या हालचाली श्वानासारख्या होत चालल्याचे आढळून आले. रेबीजचा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रविवारी सायंकाळी आयश घरी एकटाच असताना त्याने टोकाचे पाऊल उचलले. गळफास घेण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, ज्यामध्ये आपण आत्महत्या का करत आहोत याचा उल्लेख केला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयाकडे पाठवून दिला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. भटक्या श्वानांचा वावर आणि रेबीजच्या लसीकरणाबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.