चार वर्षांच्या चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; आरोपी नराधमाला लोहमार्ग पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

चार वर्षांच्या चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; आरोपी नराधमाला लोहमार्ग पोलीसांनी ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – गावी जाण्यासाठी रेल्वेच्या प्रतीक्षेत पुणे रेल्वे स्थानकातील फलाटावर झोपलेल्या कामगार कुटुंबातील चार वर्षांच्या चिमुकलीला नराधमाने खाऊचे आमिष दाखवून पळवून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पुणे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून शोध मोहीम राबवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि पीडित चिमुकलीची सुटका केली.

आरोपी महेश यादव (२५) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार बलात्कार, अपहरण आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीडला पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीन येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी असून, पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी त्याचा परिचय आहे. पीडित मुलीचे कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. ते मध्य प्रदेशातील खांडवा येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. रात्री जेवून रेल्वेची वाट पाहत पीडितेचे कुटुंबीय फलाटावर झोपले. मध्यरात्री पीडितेचे वडील जागे झाले. त्यांना मुलगी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी कुटुंबीयांसह रेल्वे स्थानकावर मुलीचा शोध घेतला.

लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने तातडीने स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात एक व्यक्ती लहान मुलीचा हात धरून तिला फलाटाच्या शेवटी घेऊन जाताना दिसला. शोधमोहिमेत सकाळी सहाला पार्सल गेट येथून आरोपीला अटक करून पीडितेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असून, पोटात दुखत असल्याने उपचार व तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक तपासात आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, पीडितेच्या आईची तक्रार नोंदवून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon