चेंबूरमधील गुलशन बाग परिसरात वाहतूक पोलिसावर हल्ला; तीन समाजकंटकांना अटक

Spread the love

चेंबूरमधील गुलशन बाग परिसरात वाहतूक पोलिसावर हल्ला; तीन समाजकंटकांना अटक

रवि निषाद / मुंबई

मुंबई : चेंबूर येथील गुलशन बाग परिसरात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी तीन समाजकंटकांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

चेंबूर येथील ट्रॅफिक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जखमी पोलिसाच्या तक्रारीवरून टिळक नगर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा क्रमांक ८८/२०२६ अन्वये बीएनएस कलम १२९, १७९(१), १९४(ड), १७७, २३९, ११८(२), १२१(१), १३२, ३(५) व ३५२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी मोहम्मद फैजान मोसफिक खान, उजेफ कादर कुरैशी आणि वसीम अब्दुल रहीम शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस सूत्रांनुसार, गुलशन बाग परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपींनी हा प्रकार केल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यावर हात उचलण्याचे धाडस या आरोपींनी केल्याचे तपासात पुढे आले आहे.

दरम्यान, टिळक नगर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, गुलशन बाग परिसरातील काही समाजकंटकांना स्थानिक पातळीवर पाठबळ मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, गुलशन बाग बाहेर असलेल्या एका कंटेनरमध्ये काही समाजकंटक बसत असून, त्या कंटेनरसाठी कोणताही परवाना घेतलेला नसल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे संबंधित महापालिका विभागाने व पोलिसांनी संयुक्तपणे त्या ठिकाणी कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

या संदर्भात परिमंडळ ६ चे उपायुक्त समीर शेख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तीन आरोपींना अटक केली आहे. घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, त्यात आणखी कोणी संशयित आढळल्यास त्यालाही अटक करण्यात येईल. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon