डार्क वेबवरील बालशोषण प्रकरणी दांपत्याला फाशी; बांदा न्यायालयाचा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ निकाल
पोलीस महानगर नेटवर्क
बांदा : डार्क वेबच्या माध्यमातून निष्पाप अल्पवयीन बालकांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बांदा येथील न्यायालयाने देशाला हादरवणारा ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणात निलंबित कनिष्ठ अभियंता रामभवन कुशवाहा आणि त्याची पत्नी दुर्गावती यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे बांदा न्यायालयाच्या इतिहासात एखाद्या महिला आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.
न्यायालयाच्या निकालानुसार, या दांपत्याने गेल्या तीन वर्षांत डार्क वेबचा वापर करून तीन वर्षांपर्यंतच्या बालकांचे अमानुष शोषण केले. या घृणास्पद कृत्यांचे व्हिडीओ व फोटो तयार करून ते जगातील ४७ देशांतील ग्राहकांना विकले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश ३१ ऑक्टोबर २०२० रोजी इंटरपोल कडून मिळालेल्या माहितीनंतर सीबीआय ने केला होता.
तपासादरम्यान आरोपींकडून ३४ व्हिडीओ आणि ६७९ आक्षेपार्ह छायाचित्रे जप्त करण्यात आली. या खटल्यात एकूण ७४ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून, त्यात २४ पीडित बालकांचाही समावेश होता. पोक्सो कायद्यांतर्गत सुनावणी घेणारे विशेष न्यायाधीश प्रदीप कुमार मिश्रा यांनी हा खटला ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ ठरवत, मानवतेला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्यासाठी फाशीचीच शिक्षा योग्य असल्याचे नमूद केले.
न्यायालयाच्या या कठोर निर्णयामुळे अशा अमानवी गुन्ह्यांविरोधात ठाम संदेश गेला असून, पीडित बालकांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.