मंगलाष्टकांऐवजी मृत्यूची किंकाळी; पिंपळनेरमधील लग्नसोहळ्यात तिहेरी हत्या, चार जण अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात एका लग्नसोहळ्यात वादातून तिहेरी हत्याकांड घडल्याने परिसर हादरला आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चाकू हल्ल्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील बिजासनी कॉलनीत राहणाऱ्या विजय गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा सुरू होता. यानिमित्त सोनगड (गुजरात) येथून वरमंडळी पिंपळनेरला आली होती. मात्र विवाहाच्या दोन दिवस आधीच मोबाईलवर ठेवलेल्या चिथावणीखोर स्टेटसमुळे दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला होता.
लग्नपत्रिकेत सोनगड येथील गोसावी समाजातील काही व्यक्तींची नावे नमूद न केल्याने यापूर्वीही वाद झाले होते. त्यातच गोसावी समाजातील सामाजिक कार्यक्रमांतील वर्चस्वावरून सोनगड आणि पिंपळनेर येथील गटांमध्ये मतभेद वाढले होते. हळदीच्या दिवशी या स्टेटसचा जाब विचारण्यासाठी गेले असता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी तीन ते चार जणांनी वधूकडील नातेवाइकांवर चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात सुरेशगिरी गोसावी (५०), साहिल गोसावी (३०) आणि देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (३०) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी गुजरातकडे पळून जात असताना पिंपळनेर पोलिसांनी नाकाबंदी करून कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि महेंद्र गोसावी यांना ताब्यात घेतले. तर चिथावणीखोर स्टेटस ठेवणारा अनिल गोसावी याला सोनगड येथून अटक करण्यात आली आहे.
लग्नघराच्या अंगणातच घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.