रबाळे एमआयडीसीतील राखीव वन क्षेत्रात कारवाईदरम्यान अडथळा; शिवसेना नगरसेवकासह तिघांविरुद्ध गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी परिसरातील राखीव वन क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत उत्खनन व काँक्रीटीकरणाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकाला अडवून शासकीय कामात अडथळा आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे) गटाचे नगरसेवक ममित चौगुले यांच्यासह तिघांविरुद्ध रबाळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन परिमंडळ अधिकारी कळवा येथील संदीप मोरे (वय ५३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रबाळे एमआयडीसी हद्दीतील यादव नगर, इलठणपाडा येथील सर्वे क्रमांक ९७ हा भूभाग महाराष्ट्र शासनाने राखीव वन म्हणून घोषित केलेला आहे. मात्र, या ठिकाणी अनधिकृतरीत्या आरसीसी रस्ता बांधकाम आणि माती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोरे यांनी वनरक्षक व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
सोमवारी दुपारी दोन जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. पंचनामा करून दोन्ही जेसीबी जप्त करण्यात आल्या. मात्र, जप्त वाहने कार्यालयाकडे नेत असताना रबाळे एमआयडीसी रोडवरील एका कंपनीसमोर काही व्यक्तींनी वन अधिकाऱ्यांना अडविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी ममित चौगुले यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत एका वनमजुराला जेसीबीमधून खाली उतरवून त्याचा मोबाइल फेकून दिल्याचे नमूद आहे. त्यानंतर संबंधितांनी एका जप्त जेसीबीसह घटनास्थळावरून पलायन केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जप्त वाहन पळवून नेणे तसेच राखीव वन क्षेत्रात बेकायदेशीर उत्खनन करणे, अशा गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानुसार, मंगळवारी (१७ फेब्रुवारी) ममित चौगुले यांच्यासह जेसीबी चालक अनंत धोत्रे आणि सुपरवायझर बाळू शंकर बाबरे यांच्याविरुद्ध भारतीय वन कायद्यान्वये तसेच नव्या दंड विधानांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.