शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर चेंगराचेंगरी; लहान मुलांसह महिला जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे जिल्ह्यातील किल्ले शिवनेरी येथे शिवजयंतीनिमित्त मोठ्या संख्येने शिवभक्तांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे गडावर मोठी चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. गडावर जाणाऱ्या मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली दरम्यान, प्रवेशद्वाराजवळ अचानक ढकलाढकली सुरू झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत काही शिवभक्त किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून त्यांना तात्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या चेंगराचेंगरीत महिला व लहान मुलही जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.गडावर गर्दीचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले . प्रशासनाकडून शिवभक्तांना संयम राखण्याचं आवाहन करण्यात आलं. या घटनेमुळे शिवजयंती उत्सवाला गालबोट लागलं.
अंबरखाण्याच्या खालच्या हत्ती दरवाजा परिसरात तसेच गणेश दरवाजा या अरुंद मार्गांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. रस्ते अरुंद असल्याने आणि एकाचवेळी मोठ्या संख्येने भाविक पुढे सरकल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. या घटनेत काही महिला व लहान मुलांसह अनेक नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
जखमींना तातडीने जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शिवजयंतीसारख्या मोठ्या उत्सवावेळी दरवर्षी मोठी गर्दी होत असल्यानं भविष्यात योग्य गर्दी नियंत्रण, प्रवेश-निर्गमन मार्गांचे नियोजन आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त हा अगोदरच्या दिवसांपासूनच गडावर ठेवणं गरजेचं आहे.