हॉटेलमध्ये अल्पवयीन बालकामगार; कल्याणमध्ये हॉटेल मालकावर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील नीलम गल्लीतील हॉटेल ताज बिर्याणी दरबार येथे १३ वर्षीय मुलाला वेटर म्हणून कामावर ठेवून त्याचे शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण केल्याप्रकरणी हॉटेल मालकाविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे बाल कामगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुस्तफा नजीर कुरेशी (२८, रा. भिवंडी-कोनगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. सदर अल्पवयीन मुलगा मागील दोन महिन्यांपासून दरमहा नऊ हजार रुपये वेतनावर काम करत असल्याचे चौकशीत समोर आले असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे.
पोलीस हवालदार विकास सोळसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वरिष्ठांच्या आदेशानुसार रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल्स व खाद्यगृहांमध्ये बाल कामगारांची तपासणी सुरू असताना नीलम गल्लीतील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलगा स्वच्छता करताना व ग्राहकांना जेवण वाढताना आढळून आला. याबाबत कामगार निरीक्षक जीवन जाधव यांना माहिती देऊन कारवाईचे संकेत मिळाल्यानंतर पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली.
तपासात संबंधित मुलाचे वय १३ वर्ष असल्याचे स्पष्ट झाले. त्या वेळी हॉटेलमध्ये मालक उपस्थित होते. पंचनामा करून अल्पवयीन बालक व मालकास पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अल्पवयीन मुलाला कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा असताना देखील त्याच्याकडून कमी मोबदल्यात अधिक श्रम करून घेण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे बालकांची काळजी व संरक्षण तसेच बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.