चेंबूरमधील छेडानगर ‘रेड लाइट झोन’कडे? लॉजिंग–बोर्डिंगवर अनैतिक प्रकारांचे आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : चेंबूरमधील छेडानगर जंक्शन परिसरात मोठ्या प्रमाणावर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. तिलक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरात सुमारे २० लॉजिंग–बोर्डिंगमध्ये बेकायदा व अनैतिक संबंधांचे प्रकार सर्रास सुरू असल्याचा दावा पोलीस सूत्रे व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी महिला व कॉल गर्ल पुरविल्या जात असल्याचे आरोप आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी कॉलेज व शालेय वयातील मुलींचा वापर होत असल्याचा दावा करण्यात येत असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यातील बहुतांश लॉजकडे आरोग्य व अग्निसुरक्षा परवाने नसतानाही ते खुलेआम सुरू असल्याचेही आरोप आहेत.
या प्रकरणात बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या आरोग्य विभागासह पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तक्रार केल्यास तक्रारदाराची नावे संबंधित लॉज चालकांना सांगितली जात असल्याने तक्रारदारांच्या जीवाला धोका निर्माण होतो, असा आरोप काही सूत्रांनी केला आहे. एका तक्रारदाराचे नाव लॉज मालकाला सांगितल्याने त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘स्वागत लॉज’मध्ये कारवाई करत पोलिसांनी एका युवकाकडून एमडी ड्रग्ज जप्त केल्याची घटना घडली होती. छेडानगर परिसरातील सुमारे २० लॉजपैकी केवळ ‘संगम’ आणि ‘श्लोक’ लॉजकडेच आरोग्य व अग्निसुरक्षा परवाने असल्याचे सांगितले जात आहे; उर्वरित लॉज बेकायदा सुरू असल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पोलीस कर्मचारी व स्थानिक प्रभावशाली व्यक्तींकडून हप्तेवसुली होत असल्याचे दावेही पुढे आले आहेत. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, परिसरातील दक्ष नागरिक, प्रबुद्ध नागरिक व समाजसेवकांनी संबंधित लॉजवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासन या आरोपांवर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.