जुन्या वादाचा राग; पुलावर एकट्याला गाठून १६ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

Spread the love

जुन्या वादाचा राग; पुलावर एकट्याला गाठून १६ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

पोलीस महानगर नेटवर्क

नांदेड : जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे ओढा चिंताजनक ठरत आहे. नांदेडमध्ये अशाच एका धक्कादायक घटनेत क्षुल्लक कारणावरून तीन अल्पवयीनांनी आपल्या १६ वर्षीय मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी दुपारी गोवर्धन घाट परिसरात घडली. भरदिवसा झालेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली.

मयत तरुण हा अकरावीमध्ये शिक्षण घेत होता. आठ–दहा दिवसांपूर्वी गल्लीतील मित्रांमध्ये झालेल्या वादातून त्याने एका मित्राला मारहाण केल्याची माहिती आहे. मध्यस्थीनंतर वाद मिटल्याचे भासले; मात्र त्या मारहाणीचा राग मनात धरून आरोपींनी हत्येचा कट रचल्याचे तपासात पुढे आले आहे.

रविवारी दुपारी मयत तरुण गोवर्धन घाट पुलाजवळ एकटाच असल्याची माहिती मिळताच तिघांनी त्याला गाठले. त्यानंतर चाकूने सपासप वार करून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला स्कुटीवरून कौठा भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने नरसी–नायगाव मार्गावर पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानाच तिघांनाही ताब्यात घेतले. विशेष म्हणजे तिन्ही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मयताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वजीराबाद पोलीस ठाणे येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon