मुलुंडमध्ये मेट्रो पिलरचा भाग कोसळून अपघात; रिक्षाचा चक्काचूर, एक मृत्युमुखी तर ३ ते ४ जण जखमी
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड परिसरात मेट्रोच्या कामादरम्यान शनिवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. मुलुंड पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस रोड) वर निर्माणाधीन मेट्रो पुलाच्या पिलरचा सिमेंटचा मोठा भाग अचानक कोसळला. हा भाग रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर पडल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू तर तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
ही घटना दुपारी सुमारे सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मुंबई मेट्रो ४ (वडाळा–कासारवडवली) मार्गिकेचे काम सुरू असताना पिलरवरील सिमेंटचा स्लॅब अचानक खाली कोसळला. या भीषण आघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रिक्षाचालकासह प्रवासी जखमी झाले असून त्यातील एक व्यक्ती काही काळ स्लॅबखाली अडकून पडली होती.
अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, मेट्रो प्रशासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्लॅब बाजूला सारून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे एलबीएस मार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती. वडाळा, घाटकोपर, मुलुंड ते कासारवडवली अशी सुमारे ३२ किलोमीटर लांबीची एलिवेटेड मेट्रो मार्गिका शहरातील वाहतुकीचा ताण कमी करणार असल्याची अपेक्षा असली, तरी अशा अपघातांमुळे मेट्रो कामाच्या सुरक्षेबाबत नागरिकांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.