प्रभाग क्र. १ मध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Spread the love

प्रभाग क्र. १ मध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. १ मध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) उत्साहात पार पडली. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

माजिवडा–मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या आनंदनगर अग्निशमन केंद्र परिसरात स्वच्छतेची शपथ घेऊन मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगरसेविका अनिता ठाकूर, नगरसेवक विक्रांत तांडेल, सहायक आयुक्त सोनल काळे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य स्वच्छता निरीक्षक शयूराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनीही सहभाग नोंदविला.

महापौरपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी कोपरी परिसरातून स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. शहरातील अंतर्गत रस्त्यांची सखोल साफसफाई, पाण्याने रस्ते धुणे यांसारख्या व्यापक स्वरूपातील मोहिमा स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने सर्व ३३ प्रभागांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

आनंदनगर अग्निशमन केंद्रापासून आनंदनगर सिग्नल, कावेसर, कासारवडवली आणि ओवळा परिसरात सर्वंकष स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेसाठी एक जेटिंग गाडी, दोन सीएनडी गाड्या, कचरा उचलण्यासाठी दोन आरसी कॉम्पॅक्टर व चार घंटागाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. सुमारे २०० सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्ते झाडून कचरा उचलण्यात आला, तसेच एसटीपीच्या पाण्याने रस्ते धुवून स्वच्छ करण्यात आले.

या अभियानात स्वच्छता निरीक्षक अक्षय सदगीर, रवींद्र म्हात्रे, महेश गायकवाड, गणेश रिपोर्टे, सुमित जाधव, समीर डोळे, उमेश सावंत, कांतीराम गायकर, प्रशांत खांबे, विशाल खांबे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक सक्रियपणे सहभागी झाले होते.

स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून शहर अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon