भारतीय डाक विभागाच्या बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून विविध राज्यांत विक्री करणाऱ्या सराईत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
मुंबई पोलिसांकडून ५ जणांना अटक, दिल्लीत १४ दिवस लावला सापळा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – देशात बनावट स्टँप घोटाळ्याचं तेलगीप्रकरण चांगलंच गाजलं होतं, या तेलगी प्रकरणानंतर सरकारी दस्ताऐवजसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टँपमध्ये काही महत्वाच्या सुधारणाही करण्यात आला. मात्र, अद्यापही स्टँपचा घोटाळा सुरू असल्याचं समोर येत आहे. नकली पोस्टल स्टॅम्प बनविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांनी आरोपींना बिहार आणि दिल्लीतून अटक केली आहे. तसेच, आरोपींकडून लाखोंचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. मुंबईतील राकेश बिंद, बिहारमधील शमशोद्दीन गफार व शाहीद रजा तसेच दिल्लीतील मोहम्मद शहाबुद्दीन शेख आणि गाझियाबाद येथील विरेंदर प्रसाद, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
भारतीय डाक विभागाच्या नावाने बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून विविध राज्यांत विक्री करणाऱ्या सराईत आंतरराज्यीय टोळीचा माता रमाबाई आंबेडकर मार्ग (एमआरए) पोलीस ठाण्याने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी बिहार आणि दिल्ली राज्यांतून आरोपींना अटक करून लाखो रुपयांचे बनावट पोस्टल स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी १२ सप्टेंबर २०२५ रोजी फिर्यादी आशुतोष जमादारसिंह कुमार (४२), डाक निरीक्षक, मुंबई जी.पी.ओ. यांच्या तक्रारीवरून एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासादरम्यान मुंबई जी.पी.ओ. कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली. तांत्रिक तपासातून आरोपी बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून ते विविध राज्यांत पाठवत असल्याची माहिती समोर आली. आरोपींच्या बँक खात्यांत ७ ते ८ कोटी रुपयांची संशयास्पद आर्थिक उलाढाल आढळून आली.
तपासात या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार दिल्ली व उत्तर प्रदेश येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजाताच आरोपी वारंवार मोबाईल क्रमांक व राहण्याचे ठिकाण बदलून फरार झाले होते. अखेर पोलीस पथकाने दिल्ली येथे १४ दिवस पाळत ठेवून गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एकूण २७ लाख ८४ हजार २०० रुपयांचे बनावट पोस्टल स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत. आरोपी विविध राज्यांत कुरिअरमार्फत हे बनावट स्टॅम्प पाठवून शासनाची फसवणूक करत होते. दरम्यान, या आरोपींच्या अटकेमुळे पुन्हा एकदा देशभरात गाजलेल्या तेलगी स्टँप घोटाळ्याची आठवण सर्वांना झाली.