न्यायालयात बनावट पेमेंट स्लिप सादर करून फसवणूक; एकास अटक, मुख्य सूत्रधार फरार
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : न्यायालयात खोटी व बनावट पेमेंट स्लिप सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा पोलीस शोध सुरू आहे.
अजिनाथ बोराटे (रा. कोंढवे धावडे, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अरविंद ललित सोमाणी (रा. खडकवासला, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
न्यायालयाने गणेश बोराटे याच्याविरुद्ध वॉरंट काढल्यानंतर जामीन प्रक्रियेदरम्यान दुमास इंडस्ट्रीज, शेड क्रमांक १, नवले इंडस्ट्रियल इस्टेट, नऱ्हे या कंपनीच्या नावाची खोटी पेमेंट स्लिप तयार करून ती न्यायालयात सादर करण्यात आली होती. तपासात ही स्लिप जामीनदार म्हणून नमूद केलेल्या विक्रम भिमाजी धोंडगे (रा. कोंढवे धावडे) यांच्या नावाने बनविण्यात आल्याचे उघड झाले.
प्राथमिक तपासात आरोपी गणेश बोराटे आणि विक्रम धोंडगे यांनी संगनमताने फिर्यादी तसेच न्यायालयाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करत शिवाजीनगर पोलिसांनी २३ जानेवारी रोजी विक्रम धोंडगे याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तो सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे.
दरम्यान, बनावट पेमेंट स्लिप तयार करणारा आरोपी गणेश अजिनाथ बोराटे फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.