सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; काळबादेवीतून दोघांना अटक, १० कोटींचं सोनं जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : तस्करीचं सोनं वितळवून बाजारात विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना सक्तवसूली संचालनालयाने (डीआरआय) अटक केली आहे. मुंबईच्या काळबादेवी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून सुमारे १० कोटी रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
डीआरआय अधिकाऱ्यांना काळबादेवी परिसरात तस्करीचं सोनं विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचत स्वप्निल जाधव आणि श्रेयस साळुंखे या दोघांना ताब्यात घेतलं. तपासादरम्यान आरोपींकडे असलेल्या वर्तमानपत्रात लपवलेले एकूण पाच किलो वजनाचे सोन्याचे बार आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत सुमारे १० कोटी रुपये असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या सोन्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे आरोपींकडे नसल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. त्यानंतर अधिक चौकशी करताच आरोपींनी अधिकाऱ्यांना एका छोट्या कारखान्यात नेलं. त्या ठिकाणी सोनं वितळवण्यासाठी वापरण्यात येणारी कटिंग व पॉलिशिंग यंत्रणा आढळून आली. कारखान्यातून काही रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे मुंबईतील सोनं तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणात आणखी आरोपी सहभागी आहेत का, याचा डीआरआयकडून तपास सुरू आहे.