पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू

Spread the love

पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर

बीड – जिल्हा पोलीस दलाच्या १७४ पदांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. परळी येथील दीपक भास्कर वाव्हळ वय (२६) या तरुणाचा मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी बुधवारी पहाटे ५ वाजेपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. दुपारी १२:३० च्या सुमारास १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर दीपकला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. उपस्थित पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. कडक ऊन आणि उकाड्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढत असताना, दुपारी १२ वाजेपर्यंत शारीरिक चाचण्या घेतल्या जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातून आलेले उमेदवार अनेकदा उपाशीपोटी चाचणी देतात, त्यात उन्हामुळे त्यांच्या शरीरावर ताण येतो. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सकाळी ९ वाजेच्या आत सर्व मैदानी चाचण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.

आपल्याला पोलीसचं व्हायचयं या ध्येयाने प्रेरित होऊन दिपकने मोठ्या आशेने पोलीस भरतीची तयारी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली तयारी त्याला एक दिवस नक्कीच यशापर्यंत पोहचवेल असा विश्वास त्याला होता. मात्र बुधवारी ज्यावेळी तो ग्राऊंडवर उभा होता आणि पोलीस होण्याचं स्वप्न त्याच्या समोरच होतं त्याचवेळी नियतीने त्याच्यावर झडप घातली आणि त्याचं पोलीस व्हायचं स्वप्न अधुरं राहिलं.

बुधवारी पोलीस भरती प्रक्रियेचा पहिलाच दिवस असल्याने राज्यभर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती मात्र पहिल्याच दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने बीड जिल्ह्यासह राज्यभर मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon