सुनेत्रा पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्री पदासह अन्य खात्यांचा पदभार; मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे अद्यापही राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे आजही अनेकांना अश्रू अनावर होतात. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तथा राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांनी ३१ जानेवारीला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी उपमुख्यमंत्री पदासह त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या विविध खात्यांचाही पदभार स्वीकारला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर मंगळवारी पहिली मंत्रिमंडळ बैठक मंत्रिमंडळात होणार असून त्या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित राहिल्या. उपमुख्यमंत्री पदासह विविध खात्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. “दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन.” असे त्यांनी आपल्या पोस्टमधून म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी मुंबईत सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, पक्षाचे नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्य महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर व अन्य आमदार आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. अजित पवार नेहमीच आम्ही शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत, असे म्हणायचे. त्यामुळे त्यांच्या या विचारांचा वारसा जपत सुनेत्रा पवारांनी चैत्यभूमीला जात अभिवादन केले. यानंतर त्या थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात पोहोचल्या. या ठिकाणी नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मंत्रालयात जात पदभार स्वीकारला. यावेळी पार्थ पवारही आपल्या आईच्या पाठिशी उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. परंतु, यावेळी पार्थ पवारांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारल्यानंतर X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
तसेच, “दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन.” असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे. अॅक्टिव मोडमध्ये आलेल्या सुनेत्रा पवारांनी अद्याप कोणतीही पत्रकार परिषद घेतलेली नाही. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.