गुंतवणूकदारांचा संताप; १,२०० कोटींच्या कथित फसवणुकीप्रकरणी आरोपींना न्यायालयात घेरण्याचा प्रयत्न, १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Spread the love

गुंतवणूकदारांचा संताप; १,२०० कोटींच्या कथित फसवणुकीप्रकरणी आरोपींना न्यायालयात घेरण्याचा प्रयत्न, १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ११ हजार गुंतवणूकदारांची सुमारे १,२०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या टीडब्ल्यूजे असोसिएटेड प्रा. लि. प्रकरणात सोमवारी ठाणे न्यायालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येत असल्याची माहिती मिळताच संतप्त गुंतवणूकदारांनी थेट न्यायालय परिसरात प्रवेश करून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी १२ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली.

२०१९ साली ठाण्यात टीडब्ल्यूजे असोसिएटेड प्रा. लि.चे संस्थापक संचालक समीर नार्वेकर, अमित बालम आणि नेहा नार्वेकर यांनी विविध उपकंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक योजना सुरू केल्या. शेअर बाजारात दरमहा १० टक्के नफा मिळत असल्याचा दावा करत त्यापैकी चार टक्के परतावा गुंतवणूकदारांना देण्याचे आमिष दाखविण्यात आले. प्रारंभी काही वर्षे नियमित परतावा मिळाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि गुंतवणुकीची व्याप्तीही वाढत गेली.

मात्र, गेल्या वर्षभरापासून परतावा थांबल्यानंतर गुंतवणूकदारांनी कंपनीकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही गुंतवणूकदारांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार समीर नार्वेकर, अमित बालम, संकेश घाग, खारघर येथील विभाग व्यवस्थापक सागर कदम आणि वागळे इस्टेट येथील विभाग व्यवस्थापक सौरव बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा समांतर तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक आयुक्त नीलिमा पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २९ जानेवारीला समीर व अमित, तर ३० जानेवारीला नेहा नार्वेकर हिला अटक केली होती.
९ फेब्रुवारीला पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाबाहेर जमलेल्या गुंतवणूकदारांनी आरोपींना बाहेर काढताना घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon