ठाणे–भिवंडी–कल्याण मेट्रो मार्गिका ५ यंदा सेवेत येण्याची शक्यता; कापूरबावडी–धामणकर नाका टप्प्याचे ९५ टक्के काम पूर्ण
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून ठाणे–भिवंडी–कल्याण मेट्रो मार्गिका क्रमांक ५ या वर्षी सेवेत येण्याची दाट शक्यता आहे. या मेट्रो मार्गिकेतील कापूरबावडी ते धामणकर नाका हा पहिला टप्पा जवळपास पूर्णत्वास पोहोचला असून सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
या पहिल्या टप्प्याची लांबी सुमारे १२.२० किलोमीटर इतकी असून कापूरबावडी, बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका अशी एकूण सात स्थानके या मार्गावर असतील. सध्या उर्वरित तांत्रिक कामे तसेच विविध चाचण्या अंतिम टप्प्यात असून आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ही मेट्रो सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे.
या मेट्रो प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी आणि कल्याण परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा असून, प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.