औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी; तलासरी पोलिसांनी २६.२८ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करत एकाला घेतले ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी तलासरी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये २६.२८ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत तलासरी पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल २६ लाख २८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई–अहमदाबाद महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे.
महामार्गावरुन मुंबईकडे जाणाऱ्या टाटा टेम्पो मधून औषधांच्या नावाखाली औषधांच्या नावाखाली महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. हिमाचल-पंजाब ढाबा परिसरात टेम्पोची तपासणी केली असता, ९ लाख २८ हजार ३२० रुपयांची दारू आढळून आली. वाहनासह एकूण २६.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी चालक शिवेंद्रकुमार लालबाबु ठाकुर (४१) याला अटक करण्यात आली असून तलासरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.