पोलीस वेषात लूट; १३.२ लाखांच्या गुन्ह्याचा नवी मुंबई गुन्हे शाखेकडून पर्दाफाश नऊ जणांच्या टोळीतून तिघांना अटक, उर्वरित आरोपींचा शोध सुरू

Spread the love

पोलीस वेषात लूट; १३.२ लाखांच्या गुन्ह्याचा नवी मुंबई गुन्हे शाखेकडून पर्दाफाश
नऊ जणांच्या टोळीतून तिघांना अटक, उर्वरित आरोपींचा शोध सुरू

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : पोलीस असल्याचे भासवत बेहिशोबी रोकड पकडण्याचे नाटक करून १३.२ लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात नऊ जणांच्या टोळीतून तिघांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

या घटनेतील तक्रारदार मनीष शिंदे (वय ५६) हे सांगली येथील साखर व्यापारी आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधत स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवले होते. १०० ग्रॅम सोन्याच्या व्यवहारावर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली होती. मात्र डिजिटल व्यवहारात अडचण येऊ शकते, असे कारण देत आरोपींनी शिंदे यांना रोख रक्कम आणण्यास सांगितले.

६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सहा अज्ञात व्यक्ती एका एमयूव्ही वाहनातून घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवून बेहिशोबी रोकड पकडण्यासाठी धाड टाकल्याचे नाटक केले. या वेळी आरोपींनी शिंदे यांना काठीने मारहाण करत त्यांच्याकडील १३.२ लाख रुपये हिसकावून घेतले आणि तेथून पळ काढला. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा तपास नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी २६ व २७ जानेवारी रोजी घणसोली आणि बेलापूर परिसरातून तीन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल तुपे (वय ३५, रा. घणसोली), रोहित शेलार (वय २६, रा. सातारा) आणि मनोज भंडारी (वय ३७, रा. कल्याण) यांचा समावेश आहे.

तपासात असेही उघड झाले आहे की, आरोपी विशाल तुपे याच्यावर यापूर्वी गोवंडी, सानपाडा, पनवेल, विक्रोळी आणि भिवंडी येथे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून या गुन्ह्यातील उर्वरित सहा आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon