आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये खळबळ; वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मुंबईतील पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये मंगळवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. आयआयटी बॉम्बेतील एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, कॅम्पसमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर विद्यार्थी कॅम्पसमधील एका वसतिगृहात वास्तव्यास होता. सकाळच्या सुमारास त्याने अचानक इमारतीवरून खाली उडी मारल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच सुरक्षारक्षक व अन्य विद्यार्थ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शैक्षणिक ताणतणाव, वैयक्तिक अडचणी किंवा अन्य काही कारणे होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. तपासाचा भाग म्हणून वसतिगृह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या मित्रमंडळींकडूनही चौकशी सुरू आहे.
देशातील नामांकित शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेमध्ये घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.