शिर्डीत हॉटेलच्या बंद खोलीत तरुणाचा मृतदेह; दरवाजा तोडताच गळफास घेतल्याचे उघड

Spread the love

शिर्डीत हॉटेलच्या बंद खोलीत तरुणाचा मृतदेह; दरवाजा तोडताच गळफास घेतल्याचे उघड

पोलीस महानगर नेटवर्क

शिर्डी : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी शहरात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली असून, येथील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत तरुण कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला. दरवाजा तोडून आत प्रवेश करताच संबंधित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे हॉटेल परिसरात खळबळ उडाली असून, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर (वय २२) असे असून तो मूळचा संगमनेर तालुक्यातील रहिवासी होता. नोकरीच्या निमित्ताने तो शिर्डीत वास्तव्यास आला होता. सध्या तो राहता तालुक्यातील गणेशनगर परिसरात राहत होता आणि संबंधित हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होता.

सोमवारी दुपारपासून हॉटेलमधील एक खोली आतून बंद असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी वारंवार दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ उलटूनही खोली उघडली जात नसल्याने संशय बळावला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हॉटेल व्यवस्थापनाने तातडीने शिर्डी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचांच्या उपस्थितीत बंद खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. आत प्रवेश करताच विशाल वायकर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला व शवविच्छेदनासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला. विशालने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोबाईल कॉल रेकॉर्ड्स व इतर बाबींच्या आधारे तपास सुरू असून, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon