मुंबईत ‘ड्रग्स क्वीन’ रुबी शेख अटकेत; २७ कोटींच्या एमडी जप्ती प्रकरणात मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई
सुधाकर नाडार / मुंबई
ठाणे : मुंबई आणि आसपासच्या परिसरात एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सचे व्यापक जाळे चालवल्याच्या आरोपाखाली रुबीना नियाजू शेख उर्फ रुबी हिला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल २७ कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्स जप्ती प्रकरणाच्या तपासात ही कारवाई करण्यात आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबी शेखविरुद्ध यापूर्वीही अमली पदार्थ तस्करीसह विविध गुन्हे दाखल आहेत. ती दीर्घकाळ ड्रग्सच्या अवैध व्यवसायात सक्रिय असून तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप तिच्यावर आहे. या प्रकरणाच्या तपासात एका स्थानिक यूट्यूबरची भूमिकाही संशयास्पद असून त्याचा तपास सुरू आहे.
यापूर्वी माजी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकानेही रुबी शेखला अटक केली होती. त्या वेळी तिच्याकडून कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम तसेच मौल्यवान साहित्य जप्त करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सध्या मुंब्रा पोलिसांनी या ड्रग्स रॅकेटचा सखोल तपास सुरू केला असून, या नेटवर्कमध्ये आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचा शोध घेतला जात आहे. पुढील तपासातून मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.