नंदुरबारमध्ये बोगस जन्म–मृत्यू दाखल्यांचा उद्योग उघड; सायबर कॅफे चालकासह दोघांना अटक

Spread the love

नंदुरबारमध्ये बोगस जन्म–मृत्यू दाखल्यांचा उद्योग उघड; सायबर कॅफे चालकासह दोघांना अटक

पोलीस महानगर नेटवर्क

नंदुरबार : शहरात गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या बोगस जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शास्त्री मार्केट परिसरातील एका सायबर कॅफेमधून प्रशासकीय यंत्रणेला फसवून बनावट कागदपत्रे तयार केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर कॅफे चालकासह दोघांना अटक करण्यात आली असून, नगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्री मार्केट भागातील आर. के. ऑनलाइन या सायबर कॅफेमध्ये हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता. अनिल यशवंत कोळी (रा. अमळथे, ता. नंदुरबार) आणि रिजवान सुभान खान (रा. मुजावर मोहल्ला, नंदुरबार) यांनी संगनमत करून बोगस जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे तयार केली. नगरपालिकेचे बनावट शिक्के तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्यांचा वापर करून नागरिकांना हे दाखले दिले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे, आरोपींनी जुन्या व जीर्ण झालेल्या जन्म–मृत्यू नोंदणी वह्या तसेच गहाळ नोंदणी क्रमांकांचा गैरवापर केला. प्रत्यक्षात कोणतीही अधिकृत नोंद नसतानाही कागदोपत्री फेरफार करून प्रमाणपत्रे तयार केली जात होती. ही बनावट प्रमाणपत्रे आरोपी रिजवानच्या मोबाईलवर पाठवली जात असून, त्यांचा वापर पुढे इतर शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी केला जात असल्याचेही समोर आले आहे.

या प्रकारामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाले असून, नागरिकांची दिशाभूल झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. याबाबत पालिकेचे कर्मचारी युवराज चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी नगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक निलेश देसले पुढील तपास करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon