सोशल मीडियावरील प्रेम प्रकरणातून तरूणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करत रोज धमकवणाऱ्या तरुणाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नंदुरबार – युवती सोबत रहावी या उद्देशाने तिच्या सोबतचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे एकाने सोशल मीडियावर प्रसारित केले. इंटरनेटच्या माध्यमातून तरुणीचा पाठलाग करून धमकावणे आणि मानसिक त्रास देणे असे कृत्य करीत होता. याबाबत पीडित युवतीने तक्रार दिली होती. संशयित आरोपी हा पुणे शिरपूर बस मधून उतरताच शिरपूर बस स्थानकावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरफळी, पोस्ट मेलाने येथील चुनीलाल उर्फ गणेश भोग्या पावरा (२७) याने पीडित २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून दि. १४ ऑगस्ट २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पीडितेसोबत काढलेले अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केली. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून तिचा पाठलाग करून धमकावणे आणि मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले. अखेर युवतीने हिंमत दाखवत तिच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दाखल केला होता.
संशयित आरोपीच्या शोधासाठी तत्काळ म्हसावद पोलीस ठाण्याचे विशेष पथकाने पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील आणि म्हसावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची जलद गतीने तपासाची चक्रे फिरवीत पीडितेच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार आरोप हा पुण्यात असल्याचे निष्पन्न झाले.
पीडितेच्या मदतीने सापळा रचून त्यास पुण्याहून शिरपूरकडे येण्यास भाग पाडले तो येणार असल्याची खात्री झाल्यानंतर शिरपूर बसस्थानक येथे पहाटेच्या सुमारास सापळा लावून रात्रभर आरोपीच्या मोबाईल लोकेशनवर पाळत ठेवून शिरपूर बसस्थानकावर सकाळी ६ वाजता चोपडा-शिरपूर बसमधून उतरत असताना चुनीलाल उर्फ गणेश भोग्या पावरा याला फिल्मी स्टाइलने अटक केली. त्याला चौकशीसाठी शहादा येथे नेण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्यावर यापूर्वी अडावद पोलीस ठाणे, जि. जळगाव येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.