आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; चितळे बंधु दुकानातील घरफोडीचा गुन्हा उघड
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : आंबेगाव पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत नऱ्हे येथील चितळे बंधु (वेद फूड्स) दुकानातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणात एका तरुणासह विधीसंघर्षीत बालकाला अटक करण्यात आली असून, या कारवाईत तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
२५ जानेवारी २०२६ रोजी दत्तनगर, नऱ्हे परिसरातील चितळे बंधु दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. या घटनेचा तपास करताना आंबेगाव पोलिस तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून ओमकार मारुती देडे (वय २१) आणि एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले.
या अटकेमुळे आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दोन तसेच विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील एक, असे एकूण तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे १ लाख २४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये एक रिक्षा, एक मोटारसायकल आणि रोख रकमेचा समावेश आहे.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर आणि त्यांच्या पथकाने केली आहे. आंबेगाव पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.