चॉकलेटचे आमिष दाखवून ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार; ७० वर्षीय नराधमाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील दिंद्रुड परिसरात चॉकलेटचे आमिष दाखवून ७० वर्षीय वृद्धाने नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारूर तालुक्यातील एका गावात शेतमजुरी करून उपजीविका करणारे कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील नऊ वर्षांची मुलगी इयत्ता चौथीत शिक्षण घेत असून, २८ जानेवारी रोजी सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. शाळेत जाण्यापूर्वी ती रस्त्यात एका मैत्रिणीला भेटण्यासाठी थांबली असताना, गावातीलच आरोपी बाबुराव केरबा निरडे (७०) याने तिला चॉकलेट देतो असे आमिष दाखवले.
आरोपीने बालिकेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेतले आणि तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर आरोपीने तिला बाहेर सोडले. त्यानंतर ती बालिका शाळेत गेली होती. मात्र, शाळेतून घरी परतल्यानंतर बालिकेच्या वर्तनात अचानक बदल झाल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. ती अत्यंत शांत, घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती. आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, बालिकेने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला. यानंतर आईने तात्काळ दिंद्रुड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी बाबुराव केरबा निरडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीस अंबाजोगाई येथून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, लहान मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिक आणि पालकांकडून होत आहे.