भिशीच्या नावाखाली १६ जणांची तब्बल ३ कोटींची फसवणूक; माय-लेकाला अटक
पोलीस महानगर नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : जादा परताव्याचे आमिष दाखवून आणि विश्वास संपादन करत भिशीच्या नावाखाली शहरातील १६ जणांकडून सुमारे २ कोटी ९९ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नंदाबाई रमेश आधुडे (४५) आणि तिचा मुलगा सौरभ रमेश आधुडे (२१, दोघे रा. व्यंकटेश पार्क, बीड बायपास; मूळ घनसावंगी, जि. जालना) यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जयश्री गजानन गिरी (४२, रा. मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीनुसार, नंदाबाई आधुडे ही गेल्या काही वर्षांपासून भिशी चालवत होती. सुरुवातीला छोट्या रकमांच्या भिशी वेळेवर पूर्ण करून तिने अनेकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये १२ लाख रुपयांची मोठी भिशी सुरू करण्यात आली. या भिशीत सहभागी झालेल्या जयश्री गिरी यांनी २० महिन्यांत दरमहा ५० हजार रुपये याप्रमाणे एकूण १० लाख रुपये भरले. यापूर्वी दिलेल्या रकमेसह त्यांचे एकूण २० लाख रुपये आरोपींकडे जमा होते.
तपासात असे उघड झाले की, सन २०१८ ते जुलै २०२५ या कालावधीत नंदाबाई व सौरभ यांनी १५ हून अधिक नागरिकांकडून एकूण २ कोटी ९९ लाख २० हजार रुपये गोळा केले. मात्र भिशीची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी पैशांची मागणी केली असता आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतली.
नंदाबाई ही मूळची घनसावंगी (जि. जालना) येथील असून गेल्या १५ वर्षांपासून शहरात वास्तव्यास आहे. भिशीच्या माध्यमातून मोठी रक्कम जमवून तिने शहरात सुमारे ७० लाखांचा आलिशान बंगला, तीन ते चार ठिकाणी मालमत्ता तसेच गावात शेती खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. पैसे मागणाऱ्या गुंतवणूकदारांना उलट खोट्या तक्रारींची भीती दाखवली जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणात जयश्री गिरी (२० लाख), प्रकाश रणमोडे (१४ लाख), नमिता बेंद्रे (१७.५० लाख), विलास माने (३० लाख), नंदा बेंद्रे (१५.५० लाख), चांद पठाण (८ लाख), सावित्री आघाव (१९.८० लाख), ज्योती घोलप (२.७० लाख), छाया चव्हाण (७.९० लाख), जिजा काळे (६.५० लाख), गुलाब राठोड (१५.५० लाख), कमलबाई सुरसे (२१.५० लाख), रंजना आघाव (१६.२० लाख), सपना मरकड (५० लाख), मीरा फलके (५० लाख) आणि राम घायाळ (४ लाख) यांचा समावेश आहे. यापैकी ६ लाख ९९ हजार ५०० रुपये ऑनलाईन, तर २ कोटी ९२ लाख २० हजार ५०० रुपये रोखीने जमा करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे करत आहेत. इतरही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.