नवी मुंबईतील स्पा सेंटरमध्ये बुद्ध प्रतिमेचा कथित गैरवापर; सामाजिक कार्यकर्त्यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Spread the love

नवी मुंबईतील स्पा सेंटरमध्ये बुद्ध प्रतिमेचा कथित गैरवापर; सामाजिक कार्यकर्त्यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

दैनिक पोलीस महानगरच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : शहरातील काही स्पा सेंटरमध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या पवित्र नावाचा, प्रतिमेचा व मूर्तीचा अनधिकृत आणि असंबंधित वापर होत असल्याचा आरोप पुढे आला आहे. या प्रकारामुळे बौद्ध अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून, प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

दैनिक पोलीस महानगरला मिळालेल्या माहितीनुसार, एका सामाजिक कार्यकर्त्याने या संदर्भात नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना लेखी निवेदन सादर केले आहे. स्पा सेंटरमध्ये बुद्ध प्रतिमा व नावाचा कथित अनैतिक व अपमानास्पद वापर तात्काळ थांबवावा, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

बौद्ध धर्मातील पवित्र प्रतीकांचा व्यावसायिक व संशयास्पद ठिकाणी वापर करणे हे अनुचित असून, यामुळे धार्मिक सौहार्दाला धक्का बसू शकतो, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, या निवेदनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नवी मुंबईतील या घटनेवर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon