कोपरखैरणे पोलिसांचे कौतुकास्पद कार्य; चोरीस गेलेले व गहाळ ८० मोबाईल मालकांना परत
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरीस गेलेले व गहाळ झालेले एकूण ८० मोबाईल फोन कोपरखैरणे पोलिसांनी CEIR (Central Equipment Identity Register) प्रणालीच्या माध्यमातून भारतातील विविध राज्यांतून हस्तगत करून मूळ मालकांना परत केले आहेत. या कामगिरीमुळे संपूर्ण नवी मुंबईत कोपरखैरणे पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या काही दिवसांत मोबाईल गहाळ व चोरीबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपआयुक्त (परि. १) वाशी विभाग नवी मुंबई पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त रबाळे विभाग राहुल धस आणि कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश भा. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक गजानन टाकळे, पोलीस हवालदार म्हात्रे, पोलीस शिपाई राहुल मोरे व विक्रम ढाणे यांनी अहोरात्र मेहनत घेत CEIR प्रणालीच्या सहाय्याने चोरीस गेलेले व गहाळ झालेले सुमारे ८० हून अधिक मोबाईल फोन हस्तगत केले. या मोबाईल्सची अंदाजे किंमत सुमारे २२ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन कोपरखैरणे पोलीस ठाण्यात संबंधित मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत नवी मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल विशेष आभार मानले. कोपरखैरणे पोलिसांच्या या यशस्वी आणि नागरिकाभिमुख कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.