दारूसाठी पैसे न दिल्याने नातवाकडून आजोबांचा खून; परळीतील धक्कादायक प्रकार

Spread the love

दारूसाठी पैसे न दिल्याने नातवाकडून आजोबांचा खून; परळीतील धक्कादायक प्रकार

पोलीस महानगर नेटवर्क

बीड : दारू पिण्यासाठी आणि मोबाईलसाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून नातवानेच आपल्या वृद्ध आजोबांची अमानुष मारहाण करून हत्या केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना बीड जिल्ह्यातील परळी शहरात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परळी परिसरात खळबळ उडाली आहे.

परळी शहरातील मिलिंदनगर भागात ही घटना घडली. रामभाऊ विठ्ठल गायकवाड (वय ७३) असे मृत आजोबांचे नाव असून शुभम बाळू गायकवाड (वय २७) असे आरोपी नातवाचे नाव आहे. शुभम हा व्यसनाधीन असून तो वारंवार दारू व इतर खर्चासाठी आजोबांकडे पैशांची मागणी करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

घटनेच्या दिवशी शुभमने दारू पिण्यासाठी आजोबा रामभाऊ यांच्याकडे पैसे मागितले. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने शुभम संतापला. यानंतर त्याने रामभाऊ यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. छाती व पोटावर जोरदार मार लागल्याने रामभाऊ गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांना मृत्यूबाबत संशय आल्याने सखोल तपास करण्यात आला. तपासात हा नैसर्गिक मृत्यू नसून मारहाणीतून झालेला खून असल्याचे उघड झाले. मृत रामभाऊ यांच्या पत्नी द्रोपदाबाई गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात शुभम गायकवाड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. वृद्ध आजोबांच्या हत्येची ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon