गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर-म्हैसकर
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई: राज्य सरकारने वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करत ज्येष्ठ सनदी अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, पोलीस प्रशासन आणि अंतर्गत सुरक्षा यांसारख्या अत्यंत संवेदनशील बाबींशी संबंधित असलेल्या या विभागाची धुरा आता अनुभवी महिला अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे.
मनीषा पाटणकर-म्हैसकर या १९९२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून, प्रशासनातील विविध महत्त्वाच्या विभागांत त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. नियोजनबद्ध कामकाज, निर्णयक्षम नेतृत्व आणि काटेकोर प्रशासनशैली यासाठी त्या ओळखल्या जातात. सध्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या बदलीने निर्माण झालेल्या रिक्त पदावर मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, ३१ जानेवारी रोजी पाटणकर-म्हैसकर यांनी त्यांच्याकडे कार्यभार सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गृह विभाग हा थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विभाग मानला जातो. या विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव हे पद पोलीस दलाचे प्रशासकीय नियंत्रण, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या-नियुक्त्या, तसेच कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या पदावरील नियुक्तीला विशेष महत्त्व दिले जाते.
पाटणकर-म्हैसकर यांच्या अनुभवाचा फायदा गृह विभागाच्या कामकाजाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनात पारदर्शकता, निर्णयप्रक्रियेत गती आणि समन्वय वाढण्याबरोबरच अंतर्गत सुरक्षेशी संबंधित आव्हानांना अधिक परिणामकारकपणे सामोरे जाण्यास मदत होईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
महिला अधिकाऱ्याच्या रूपाने गृह विभागाच्या उच्च प्रशासकीय पदावर झालेली ही नियुक्ती प्रशासनातील बदलत्या नेतृत्वदृष्टीचेही द्योतक मानली जात असून, आगामी काळात गृह विभागाच्या कामकाजाला नवी दिशा आणि वेग मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.