४०० मीटरच्या प्रवासासाठी टॅक्सी चालकाने घेतले तब्बल १८ हजार भाडे; अमेरिकेतील महिलेच्या पोस्टनंतर चालकाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई – केवळ ४०० मीटरच्या प्रवासासाठी तब्बल १८ हजार रुपये भाडे घेतले तर तुमचा नक्कीच संताप होईल ना? असाच प्रकार अर्जेंटिना अरियानो या अमेरिकेतील महिलेच्या बाबत मुंबईत घडला. यामुळे त्यांनी मायदेशी गेल्यानंतर सोशल मीडियावरून आवाज उठविला. त्यानंतर सहार पोलिसांनी तपासचक्रे फिरवत यशराज यादव उर्फ पप्पू (५०) या टॅक्सी चालकाला अटक केली आहे.
अर्जेंटिना या १२ जानेवारी रोजी मध्यरात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्या होत्या. विमानतळाजवळील केवळ ४०० मीटर अंतरावरील हॉटेलपर्यंतच्या प्रवासासाठी टॅक्सी चालकाने त्यांच्याकडून १८ हजार रुपये घेतले. यादवने तिला अंधेरी (पूर्व) परिसरात सुमारे २० मिनिटे फिरवले. त्यानंतर पुन्हा त्याच परिसरातील हॉटेलमध्ये सोडून भाडे घेतले.
अर्जेंटिना यांनी २६ जानेवारी रोजी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. यामध्ये मुंबईत प्रवास भाड्याच्या मोठ्या रकमेच्या वसुलीबाबत लिहिले होते. मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांना टॅग करत ‘स्कॅम हॅशटॅग’ वापरला होता.या पोस्टला प्रतिसाद देताना मुंबई पोलिसांनी, “आम्ही तुम्हाला फॉलो केले आहे. कृपया तुमचा संपर्क तपशील डीएममध्ये पाठवा,” असे उत्तर दिले. त्यानंतर सहार पोलिसांनी चौकशी सुरू केली.
पीडितेचा जबाब व्हिडीओ कॉल किंवा ई-मेलद्वारे घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तिने या घटनेची माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांना दिली नव्हती. पोलिसांच्या औपचारिक तक्रार दाखल करण्याच्या विनंतीला तिने ‘ओके’ असे उत्तर दिले, मात्र तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर सहार पोलिसांनी २८ जानेवारी रोजी स्वतःहून (सुओ मोटो) चालकाविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.- आरोपी यादव याचा चालक परवाना रद्द करण्यासाठी त्याची माहिती आरटीओकडे पाठवली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील अन्य एक आरोपी पसार आहे. पोलीस ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाला जबाबासाठी बोलावणार आहेत, असेही सांगितले.