नागपाडा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी; ६ जण गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या नागपाडा परिसरात गुरुवारी रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वादातून भीषण हाणामारी झाल्याची घटना घडली. या हिंसक घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत आतापर्यंत १३ जणांना ताब्यात घेतले आहे. दोन गटांत नेमका कशामुळे वाद झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री नागपाडा परिसरात दोन गटांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला आणि काही क्षणातच हा वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १३ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. मुंबई पोलिसांनी या हिंसाचाराची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.